Thursday, December 29, 2011

यशाची मूलभूत साधने


यशाची मूलभूत साधने
आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये ताठ मानेने जगण्यासाठी व समर्थपणे सर्व आव्हाने पेलण्यासाठी, आम्हाला आमची कौशल्ये, क्षमता व गुणांचे संवर्धन करावे लागणार. त्यासाठी वैज्ञानिक दृष्टीने स्वत:चे निरीक्षण करणे, गरजेनुसार स्वत:च्या दैनंदिन जीवनामध्ये वेगवेगळ्या पातळ्यांवर, विविध प्रयोग करुन, आवश्यक ते परिवर्तन करणे ही आवश्यक असेल. स्वत:मध्ये असणार्‍या कौशल्ये, क्षमता व गुणांचा शोध घेणे व त्यामध्ये सतत भर घालण्यासाठी प्रयत्न करत राहणे महत्वाचे असेल. हे सर्व शिकण्यासाठी व प्रत्यक्ष कृतिमध्ये आणण्यासाठी, अशा काही चाकोरी सोडून जगणार्‍या यशस्वी व्यक्तिमत्वांचा सहवास व त्यांच्या अनुभवांचे शेअरींग खूपच उपयोगी व मार्गदर्शक ठरु शकेल. काहीतरी वेगळे करू इच्छिणार्‍यांसाठी तर हे नक्कीच दिशादिग्दर्शक ठरु शकेल.
विज्ञान हे आमच्या दैनंदिन जगण्यामध्ये येणे, आमच्या प्रत्येक विचार व आचारामध्ये येणे म्हणजे खर्‍या अर्थाने वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासणे होय. याप्रकारे विज्ञाननिष्ठ होता आलं तर आमचे जीवन हे बदलणारच. त्यासाठी स्वत:च्या आयुष्यात प्रयोग करत राहणे मात्र गरजेचे आहे. आम्ही अशाप्रकारे स्वत:ला कधी तपासलेले नसते. त्यामुळे स्वत:ला स्वत:ची ओळखसुध्दा फारच अपुरी असते. त्यामुळे स्वत:ला खर्‍या अर्थाने ओळखणे, स्वत:चा शोध घेणे, अशा प्रकारे सुरुवात करता येऊ शकते.
त्यादृष्टीने आम्हाला आमच्या जीवनामध्ये दोन प्रकारे शोध घ्यायला पाहिजे. या जगामध्ये राहणार्‍या सातशे कोटी लोकांपैकी कोणत्याही दोन व्यक्तींच्या अंगठ्याचे ठसेसुध्दा सारखे नसतात. मग जर आमचा प्रत्येकाचा अंगठ्याचा ठसासुध्दा सारखा नाही, याचाच अर्थ माझ्यामध्ये नक्कीच असे काहीतरी वेगळे आहे, जे या संपूर्ण जगामध्ये फक्त माझ्यामध्येच आहे व इतर कोणाहीमध्ये ते नाही, याचा शोध लागला तर कायम स्पर्धा करण्याची गरज राहणार नाही. दुसर्‍या बाजूने आमच्यामध्ये एवढ्या सगळ्या विविधता असतानांसुध्दा आमच्यामध्ये काहीतरी समान आहे. या समानतत्वाचा शोध लागल्यास प्रत्येकाशी माझे नाते जडेल. अशाप्रकारे या दोन अंगांनी स्वत:चा शोध घेणे माणसाच्या जगण्याला अर्थ प्राप्त करून देतो. असा शोध घेणे हाच माणसाचा जगण्याचा हेतू असावा. असा शोध घेणे इतर प्राणीमात्रांना शक्य नाही. माणूस मात्र असा शोध निश्‍चित घेवू शकतो. असा शोध जर घ्यायला सुरुवात केली तर आमच्या आयुष्याची लांबी आणि खोलीसुध्दा आपोआपच वाढेल. आनंद व खर्‍या अर्थाने मस्तीमध्ये प्रत्येक क्षण जगते येईल.
मला काहीतरी नविन शिकायचे आहे वा माझ्यकडे असलेले काहीतरी मला द्यायचे आहे, ही वृत्ती आम्हाला जगण्याचा अर्थ शोधण्यामध्ये मदत करते. सामान्य व असामान्य किंवा यशस्वी व अयशस्वी व्यक्तीमध्ये फारसा फरक नसतो. जसा एखादा मूर्तिकार छन्नी-हातोडा घेवून मूर्ती कोरतांना दगडावर घाव घालत असतो. १०-२०-५० घाव लागोपाठ मारूनही जेंव्हा दगड फुटत नाही तेंव्हा त्याला जर वाटले की ५० वेळा घाव घालूनही दगड फुटला नाही याचाच अर्थ पुढचे ५० घावही दगड फुटणार नाही आणि त्याने प्रयत्न करणे सोडून दिले तर तो अयशस्वी ठरतो. यशस्वी व्यक्ती प्रयत्न सोडत नाही व बरेचदा तो दगड ५१ व्या घावातच फुटतो. म्हणजेच यशस्वी आणि अयशस्वी व्यक्तीमध्ये ५० घावांचे अंतर नसते, तर बरेचदा केवळ एकाच घावाचे अंतर असते. आपल्यापैकी अनेक लोक यशप्राप्तीसाठी प्रयत्न करून ही अयशस्वी झालो असू तर यशापासून आपण काही पावलेच दूर होतो हे विसरू नका व प्रयत्न सोडू नका. यश नक्कीच तुमच्या गळ्यात माळ टाकल्याशिवाय राहणार नाही.
शरीर, बुद्धी, मन व वेळ आणि पैसा ही यशप्राप्तीची मूलभूत साधने आपण कशी वापरतो यावर आपलं भविष्य अवलंबून असते. एखाद्या कारागिराला जशी आपली हत्यारे नेहमी धारदार ठेवावी लागतात व काळजीपूर्वक वापरावी लागतात, तशीच आपणही ही पाच हत्यारे कायम धारदार कशी राहतील व त्यांचा योग्य तो वापर कसा करायचा याचा विचार करावा लागेल व यावरच आपलं भविष्य व भवितव्य अवलंबून असेल.

माणसाचं आयुष्य तो किती वर्ष जगला यावर नाही तर, किती अविस्मरणीय क्षण जगला यावरून मोजायचे असते. आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तींकडून तर आपण शिकतच असतो. खरी कसोटी तर आपल्यापेक्षा लहान व्यक्तींकडून शिकण्यात असते. आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींकडे त्या नजरेने पहायला शिकणे ही खरी दृष्टी असेल. यालाच गुणग्राहकता असेही म्हणतात. ही सर्वांकडून शिकण्याची वृत्ती कायम राखणे आम्हाला समृध्द बनवित असते. ‘‘ज्या लोकांना कशासाठी जगायच हे माहिती असते, ते कोणत्याही परिस्थितीत आनंदाने जगू शकतात. ज्यांना हे माहिती नसते ते लोक आयुष्यभर कसं जगायचं याच चक्रात अडकलेले असतात.’’ मी कशासाठी जगतो आहे, माझ्या जगण्याचा हेतू काय आहे, हे जर मला नाही कळले तर आयुष्य नुसतेच खाण्यापिण्यात व निरर्थक गोष्टी करण्यात वाया जाईल. आयुष्य हे एकदाच मिळते व ते अमूल्य आहे. मग ते केवळ पैशांसाठी एक्सेंज करणे हा मूर्खपणा असेल. त्याहून मोठे काहीतरी आयुष्यात करायचे आहे, ते काय असेल ते तुमच्यासाठी तुम्हालाच ठरवायचं आहे.
(यशस्वी व्हा या मी लिहिलेल्या पुस्तकामधून घेतलेला लेख) 

Monday, December 12, 2011

माझा शैक्षणिक प्रवास


माझा शैक्षणिक प्रवास
बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा या जन्मगावीच माझे दहावी-बारावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले. घरी निम्न मध्यमवर्गीय व्यापारी कुटूंबाची पार्श्‍वभूमी. घरामध्ये कुणी फार जास्त शिकलेले नव्हते. १०+२ या अभ्यासक्रमाची माझी पहिली बॅच. १९७५ साली दहावी, तर १९७७ साली बारावी झालो. अभ्यासामध्ये सुरवातीपासून चांगला होतो. चौथी व सातवीला स्कॉलरशिप परिक्षा गुणवत्ता यादीमध्ये पास झालो. दहावीला नागपूर बोर्डातून गुणवत्ता यादीत १६ वा क्रमांक व संपूर्ण बोर्डातून मराठीमध्ये प्रथम, गणितामध्ये द्वितीय, तर विज्ञानामध्ये तिसरा क्रमांक आलेला. बारावीच्या परिक्षेत सुध्दा गुणवत्ता यादीमध्ये पास झालो. पुढे नागपूर शासकीय महाविद्यालयामधून एमबीबीएस ही पदवीसुध्दा प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झालो.
मागे वळून पाहिले असता हे जे काही शैक्षणिक यश मी मिळवू शकलो, त्याची कारणे काय असावीत याचा विचार करतो तेंव्हा काय वाटते ते तुमच्याशी शेअर करतोय. माझे गाव सिंदखेडराजा हे तसे आडवळणाचे, जेमतेम ८००० लोकवस्तीचे. आता तालुक्याचे केंद्र झालेय. तेंव्हा तालुका सुध्दा नव्हता१९७५ साली म्हणजे आज पासून ३७ वर्षांपूर्वी इतर कुठल्याही आधुनिक सोयी-सुविधांचा अभाव, फारशा मार्गदर्शनाची शक्यता तर नव्हतीच. मग असे असतांना १०-१२ वी ला आणि पुढे सुध्दा जे यश मी मिळवू शकलो याची कारणे शोधली असता एक लक्षात येते, ते म्हणजे लहानपणापासून वाचनाची असलेली आवड. त्याकाळात सिंदखेडराजासारख्या छोट्याशा आडवळणाच्या गावात वाचायला तरी काय मिळणार ? पण घरी किराणा दुकाण असल्याने सामान बांधून देण्यासाठी वर्तमानपत्राची रद्दी भरपूर असायची; त्यातून शनिवार-रविवारच्या पुरवण्या काढून वाचायचो. पुढे सातवी-आठवीमध्ये असतांना रहस्यमय कांदबर्‍या वाचायला लागलो. त्याकाळात बाबुराव अर्नाळकरांच्या झुंजार, काळापहाड इ. रहस्यकथा लोकप्रिय होत्या. १००-१५० पानांचे पुस्तक साधारणत: तासाभरात वाचून होत असे. नववीमध्ये असतांना हिंदी वाचनाची सुरूवात झाली. गुलशन नंदा, रानू इ. लेखकांचे उपन्यास त्याकाळी चलनात होते. दहाव्या वर्गात असतांना अशी निदान १०० तरी पुस्तके मी वाचली असतील. घरचे रागावतील म्हणून अभ्यासाच्या वही-पुस्तकामध्ये लपवून वाचायचो. २००-२५० पानांचे पुस्तक दोनेक तासात वाचून संपवायचो. ही जी वाचनाची आवड होती, त्यामुळेच वाचनाचा वेग वाढला, शब्दभांडार समृद्ध झाले व अभिव्यक्ती पण सुधारली असावी. त्यामुळेच कदाचित मराठी विषयामध्ये बोर्डात प्रथम क्रमांक मिळवू शकलो. हे केवळ मराठी विषयाच्या अभ्यासाने नक्कीच शक्य झाले नसते.
दहावीला गणितामध्ये १४९ मार्क मिळवून बोर्डात दुसरा क्रमांक होता. हे पण केवळ गणिताच्या पुस्तकाच्या अभ्यासाने घडले नाही. तर घरी दुकान होते. समोर दुकान व मागे घर असल्याने अगदी लहानपणापासून दुकानात बसावे लागायचे. ग्राहकांशी व्यवहार करतांना हिशोब करावा लागायचा. तोही बहुतेक वेळा तोंडी, कॅल्क्युलेटर वगैरे तर त्याकाळी पोहचलेलेच नव्हते. माझ्या वडीलांचा हिशोब तर अगदी तोंडपाठ असायचा. कितीही अंकी बेरजा ते अगदी झटक्यात व बिनचूक करायचेत. त्यांच्या प्रभावाने हिशोब जलदगतीने व न चुकता करायला शिकलो. आठवीत असतांना शाळेमध्ये संचयनी ही विद्यार्थ्यांची बचत बँक हि योजना नव्यानेच सुरू झाली होती, तिचा मॅनेजर म्हणून काम केले. या सर्वांचा फायदा गणित विषयाच्या अभ्यासासाठी सहजच झाला. म्हणूनच कदाचित गणित हा विषय माझा नेहमीसाठीच अतिशय आवडता राहिला. गणित विषयाच्या आवड व अभ्यासाने एकूणच माझ्यामध्ये असलेली हिशोबी वृत्ती विकसित झाली असावी व त्यामुळेच आयुष्यातील बर्‍याच गोष्टी काटेकोर व हिशोबाने करण्याची सवय लागली.
विज्ञान या विषयामध्ये १४७ मार्क घेवून बोर्डात ३ रा क्रमांक होता. त्याचेही कारण केवळ विज्ञानाच्या पुस्तकांचा अभ्यास नाही; तर निरीक्षण व प्रयोग करून पाहण्याचा छंद. आठवीपासून माझ्या घरी माझी स्वत:ची भंगार सामानामधून उभारलेली छोटीशी प्रयोगशाळा होती. या प्रयोगशाळेत भौतिक, रसायन व जीवशास्त्राचे बहुतेक सर्व प्रयोग मी स्वत: केल्याचे आज ४० वर्षांनतरही मला स्पष्ट आठवते. त्यामुळे विज्ञानाचा अभ्यास हा खेळाचा व आनंदाचा भाग झाला व त्याचे रुपांतर मार्कांमध्येही झाले. त्याशिवाय यातून वैज्ञानिक दृष्टी विकसित झाली, निरीक्षण व प्रयोगशीलता ही विज्ञानाचा अभ्यास करण्याची मूलभूत साधने हाताळण्याचे कसब प्राप्त झाले; प्रत्यक्ष जीवनाच्याही प्रयोगशाळेत त्यामुळे नानाविध प्रयोग करता आलेत व जगणे सुध्दा आनंद व खेळ झाले. कोणत्याही प्रश्‍नाचा शास्त्रीय दृष्टीने विचार करून उत्तरे शोधण्याची सवय लागली. समस्येला समस्या न मानता चॅलेंज म्हणून बघायला शिकलो. अशा आव्हानांना सामोरे जातांना स्वत:च्या क्षमतांचा शोध घेवून त्या विकसित करता आल्यात.
याच सवयी व वृत्ती पुढे १२ वी व मेडीकल कॉलेजमध्येही कायम राहिल्याने नेहमीच अभ्यास एन्जॉय करू शकलो. बहुतेक अभ्यासाची पुस्तके पण कथा-कादंबर्‍या वाचल्यासारखा आनंद देवून जायचीत. त्यामुळे अभ्यासाचे ओझे कधी वाटले नाही व फक्त परिक्षेमध्ये मार्क मिळविण्याच्या हेतूने पण कधी अभ्यास केला नाही.
आता कोणतीही परिक्षा द्यायची नसली तरी अभ्यासाची हीच सवय कायम आहे. आजही वर्षाला विविध विषयांचे, इंग्रजी, मराठी व हिंदी या तीनही भाषांमधील साधारणपणे ४०००० पेजेस वाचतो. त्यामुळे आनंद तर मिळतोच; शिवाय जगाच्या बरोबर राहता येते. 
यावेळी एवढेच. याच प्रवासातील काही अनुभव पुढच्या वेळी .......
(१ नोव्हेंबर पासून दर आठवड्याला काही तरी लिहायचे ठरवले होते. पण अजून सवय पक्की व्हायची आहे. आतापर्यंत तीन लेख लिहून झालेत. शतायुषी होण्यासाठी ! सदा तरुण राहण्यासाठी !, आपले वजन:आपल्या जीवनशैलीचे निदर्शक, व उपाशी न राहता वजन कमी करा, काही वैज्ञानिक तथ्ये व व्यावहारिक क्लुप्त्या  मागील ४० दिवसात जवळपास २७०० भेटी ब्लॉगला झाल्यात. आपण सर्वांचा जो उदंड प्रतिसाद मिळातोय, तो मला आळस झटकून लिहिणे सुरु ठेवायला भाग पाडत आहे.
आता मी माझ्या आयुष्यातील काही अनुभव, काही लर्निन्ग्स तुमच्यासोबत शेअर करण्याचे ठरवीत आहे. माझा शैक्षणिक प्रवास या आताच्या लेखात मला मिळालेल्या शैक्षणिक यशाकडे मागे वळून पाहताना काय वाटते ते लिहिले आहे. कदाचित यापैकी काही तुम्हाला पण उपयोगी पडू शकतील. प्रतिसादाच्या प्रतीक्षेत.)