Thursday, March 13, 2014

स्पार्क /"घडू या जिंकण्यासाठी" शिबिराचा वृत्तांत


प्रयास, द्वारा १० व्या वर्गाच्या विद्यार्थ्यांचे २००८ पासून घेतल्या जाणाऱ्या 
स्पार्क /घडू या  जिंकण्यासाठी 
शिबिराचा वृत्तांत
        
(यावर्षी असेच शिबीर अमरावती येथे दि 1 ते 8 एप्रिल या कालावधीत होणार आहे.
शिबिराच्या नोंदणीसाठी लगेच संपर्क करावा.) फोन  ०७२१-२५७३२५६  
मुलांमध्ये जिंकण्याची वृत्ती विकसित व्हावी व त्यासाठी आवश्यक असणार्‍या स्वत:च्या क्षमता, कौशल्ये व गुणांचा शोध घेता यावा यासाठी प्रयास, अमरावती या संस्थेद्वारा स्पार्क /‘घडू या जिंकण्यासाठी’ हे आगळे वेगळे शिबिर दरवर्षी अमरावती येथे घेण्यात येते. शिबिराला महाराष्ट्राच्या विविध भागातून विद्यार्थी सहभागी होतात. शिबिराची संकल्पना व नियोजन प्रयासचे संचालक डॉ. अविनाश सावजी यांचे असते.
        दहाव्या वर्गाच्या अभ्यासाच्या चक्रात वर्षभर पिळल्या गेलेल्या विद्यार्थ्यांना जरा निवांतपणा मिळावा, काका-मामाच्या गावाला गेल्यासारखे पण वाटावे व सोबतच जिंकण्याची वृत्ती सुध्दा विकसित व्हावी या दृष्टीने शिबिराचे वेळापत्रक व अभ्यासक्रम ठरविलेला आहे. सकाळी ७ ते १२ दैनिक ठरलेले उपक्रम, तर इतर वेळ मुलांच्या इच्छेप्रमाणे व प्रोजेक्ट वर्कसाठी मोकळा अशी विभागणी असते. सकाळी योगासन-प्राणायामाचे सत्र, प्रार्थना व समूहगान, त्यानंतर नाश्ता व सोबतच काल काय झाले याबाबतचे डायरी वाचन, त्यानंतर काही बोलविलेल्या दादा-ताई वा काका-काकूंच्या मुलाखती, आयुष्याची दिशा ठरविण्यासाठी प्रत्येकाने २0 वर्ष नंतर मी कोठे असेल त्याचे स्वत:साठी व्हिजन 2033 तयार करण्यासाठीचे विशेष सत्र, असा सकाळचा दिनक्रम होता. करिअर संदर्भात स्पष्टता यावी म्हणून काही वैद्यक, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, समाजकार्य सारख्या क्षेत्रात शिक्षण घेणार्‍या सेवांकुरच्या विद्यार्थी मित्रांना साधन व्यक्ती म्हणून बोलविले जाते. शिबिरार्थींनी त्यांच्या मुलाखती घेतात व आपल्या मनातील प्रश्‍नांचा उलगडा करुन घेतात. हा संवाद दोघांनाही खूपच फायद्याचा ठरतो. शिबिराच्या पहिल्याच दिवशी मुलाखत कशी घ्यायची हे शिकल्यामुळे, सर्व शिबिरार्थी अगदी कोणीही आले तर त्यांची मुलाखत घेवूनच टाकतात. अशा १०-१५ व्यक्तींच्या तरी मुलाखती शिबिर कालावधीत घेतल्या जातात.  
      डायरी लेखन : रोज काय काय घडले, काय नविन अनुभव आला, काय शिकलात, स्वत:चे विचार, भावना व वर्तन कसे होते, अशा सर्व संदर्भात रोज डायरी लिहिल्यामुळे शिबिर कालावधीत जवळपास प्रत्येकाचेच २५-३० पानांचे लेखन तयार होते. डायरीचे रोज सर्वांसमोर वाचन होत असल्याने सर्वांना एकदुसर्‍यांची जवळून ओळख व्हायला, परस्परांचे विचार, भावना, वर्तन समजून घ्यायला खूपच मदत होते. शिवाय घरी गेल्यावर पालकांना व मित्रांनाही शिबिरामध्ये काय झाले हे स्पष्टपणे कळू शकते. एकूणच त्यांचा भावनिक बुध्यांक विकसित व्हायला मदत होते.
     व्हिजन 2033: म्हणजेच स्वत:च्या आयुष्याचा मास्टर प्लॅन तयार करणे, जसे 2033 साली तुम्ही कोठे असाल, काय करत असाल, तुमचा आर्थिक स्तर किती असेल, तुमचे कौटुंबिक आयुष्य कसे असेल, तुमची समाजत काय ओळख झालेली असेल इत्यादिंबाबत चिंतन करुन ते कागदावर उतरविणे. अशाप्रकारे जीवनाची आखणी करण्याचा विचारसुध्दा आपल्याकडे अगदी थोरामोठ्यांकडे सुध्दा दिसत नाही. त्यामुळे आपल्याला पाहिजे आहे असे जीवन आपल्यापैकी फार कमी लोकांना जगायला मिळते. याप्रकारे आतापासूनच विचार करण्याची दृष्टी विकसित व्हावी या हेतूने शिबिर कालावधीत रोज थोडे-थोडे, असे टप्प्या-टप्प्याने स्वत:च्या आयुष्याचा आराखडा सर्व शिबिरार्थींना तयार करून घेतला जातो. अर्थातच हे सर्व जरा डोक्याला ताण देणारे असल्याने थोडे भारी जाते; पण प्रकि‘या कळल्याने व नविन दृष्टी मिळाल्याने सर्वांना मजा पण येते.  
    पुस्तकांचे मार्केटींग : मार्केटींग कौशल्य विकसित व्हावे यासाठी शिबिरार्थी दोन दिवस शामची आई, सत्याचे प्रयोग यासारखी काही पुस्तके घेवून कॉलनीमध्ये घरोघरी विक्री करण्यासाठी जातात. काही घरांमध्ये बाहेरच्या बाहेरच रवानगी झाली, तर काही ठिकाणी सरबत मिळेपर्यंत पोहच झाली. काहींची पुस्तके विकलीत, तर काहींची एकही नाही. या सर्व कडूगोड अनुभवांचे परतल्यावर देवाण-घेवाण व विश्‍लेषण होते. अनोळखी घरांमध्ये अशाप्रकारे जावून स्वत:ची ओळख सांगून व पुस्तकांबद्दल माहिती देवून विक्री करणे, परत आल्यावर आलेल्या अनुभवांवर चर्चा व विश्‍लेषण करणे यातून मुलांचा आत्मविश्‍वास खूप वाढतो. 
  रात्री बारा वाजता स्मशानाला भेट : एक दिवस अंधश्रध्दा व भूत-प्रेत या विषयावरील चर्चेदरम्यान या सर्व अंधश्रध्दा असून आम्हाला भिती वगैरे काही वाटत नाही असे सर्व म्हणालेत. त्यांना डिवचण्यासाठी म्हणून रात्री बारा वाजता स्मशानात जावून दाखवाल का असे सहजच म्हटले. मात्र मुलांनी ते गांभीर्याने घेतल्याचे रात्री साडे अकरा वाजता, आम्हाला स्मशानात जायचे आहे असा आग‘ह धरल्यावर कळले. एका मुलीच्या वडीलांसोबत जाण्याची मी परवानगी दिली. झाले ! आतापर्यंतच्या आयुष्यात साधा बसचा तासाभराचा प्रवाससुध्दा कधी एकट्याने न केलेली सर्व मुले-मुली, रात्री बारा ते दीड पर्यंत स्मशानात होती. नुकतेच दाहसंस्कार झालेले प्रेत त्यांनी पाहिले, सगळीकडे फीरलेत, तेथील चौकीदाराची मुलाखत घेतली व परत आलेत. ही भेट त्यांच्यासाठी आयुष्यभराचा ठेवा असलेला अनुभव ठरला. विशेषत: मुलींसाठी, कारण त्यांना तसेही स्मशानात जाण्याचा प्रसंग कधीच येत नाही. या भेटीने सर्वांचीच स्व-प्रतिमा एकदमच उंचावली व आपण ठरवले ते करु शकतो हा विश्‍वास दृढ झाला. पहिल्या शिबिरात सहज घडलेली हि भेट आता दर शिबिराचा नियमित उपक्रमच झालाय. 
    पोलीस स्टेशनला भेट : एक दिवस मुलांना सांगितले जाते की तुम्हाला राजापेठ पोलीस स्टेशनला जायचे आहे. स्वत:ची ओळख करुन द्यायची व तेथील कामकाजाची सर्व माहिती घेवून यायचे. सोबत कोणीही मोठी व्यक्ती मुद्दामच गेली नाही. मुले स्वत:हून गेलीत, ठाणेदारापासून ते पोलीस कोठडीतील कैद्यांपर्यंत सर्वांना प्रश्‍न विचारून त्यांनी आपली जिज्ञासा शमवली. सर्वांच्या मुलाखती घेवून व तेथील सर्व कामकाज समजून घेवूनच परतलीत. आत्मविश्‍वासामध्ये आणखी एक तुरा !
    जंगल भ्रमंती व सामाजिक संस्थांना भेट : एक दिवस सर्वांनी सोबत भटकंतीसाठी वापरला जातो. सकाळीच शहराला लागून असलेल्या जंगलामध्ये भटकायला जाणे, काट्याकुट्यातून ३-४ किमी. ची रपेट सर्वांना खूप आनंद देवून जाते. मुलांना निरनिराळ्या सामाजिक समस्या कळाव्यात व त्यांची संवेदनशीलता वाढावी यासाठी काही संस्थांना भेटी देण्यात येतात. मातोश्री वृध्दाश्रमातील आजी-आजोबांशी बोलतांना बर्‍याच मुलांच्या डोळ्यांमध्ये अश्रू होते. तशीच अवस्था तपोवनातील कुष्ठरोगी आजी-आजोबांना व राष्ट्रीय अपंग कल्याण संस्थेतील ताई-दादांना भेटतांना झाली होती. मुलांमधील ही संवेदनशीलता प्रगट होण्यास कदाचित शिबिराचे वातावरण कारणीभूत ठरले असावे. तेथील कुष्ठरोगी, अंध-अपंग यांच्या पुनर्वसनाची विविध कामे पाहून, सर्व भारावल्या गेलीत. ते सर्व एवढे सगळे करु शकतात तर आम्ही का नाही असे पण बहुतेकांना वाटले. 
       बहुतेकांसाठी घराबाहेर राहण्याचा हा पहिलाच प्रसंग होता. रोजच्या स्वयंपाकात, जेवणाची तयारी करण्यात हातभार लावणे, स्वतःचे ताट स्वतः धुणे यासार‘या गोष्टी मुलांनी प्रथमच केल्या. 
      मामाच्या गावाला जावू या चा अनुभव : दररोज मुक्त वेळामध्ये त्यांनी पुस्तके वाचलीत, आपल्या आवडत्या कार्यकमाच्या सीडी पाहिल्यात आणि गप्पा तर भरपूरच मारल्यात. तसेही शिस्तीचे व वेळेचे वगैरे फारसे बंधन जाणीवपूर्वकच ठेवलेले नव्हते. रात्री ११-१२ वाजेपर्यंत मैफील रंगायची. रात्री केंव्हाही झोपलेत तरी सकाळी मात्र बरोबर ७ वाजता न बोलवता योगाच्या सत्रासाठी सर्व हजर. डायरी लिहिणे व ठरलेले होमवर्क पूर्ण करणे आपसूकच व्हायचे. मुला-मुलींमध्ये अतिशय निकोप व जबाबादारीचे नाते विकसित झाले. शिबिरादरम्यानच एका मैत्रिणीच्या वाढदिवसाचे निमंत्रण मिळाले, तेव्हा छान खाऊनपिऊन त्यांनी तो एन्जॉय तर केलाच, शिवाय तिला उपयुक्त ठरेल असे एक पुस्तक भेट देण्याची सूचकता पण दाखवली. 
      शिबिराचे आठ दिवस कसे संपले ते मुलांना कळलेच नाही. पहिल्या दिवशी एकमेकांना अनोळखी असणा़र्या  शिबिरार्थींची अगदी छान गट्टी जमली होती. शेवटच्या दिवशी सर्वांनी एक-दुस़र्‍याचे कोणते गुण आवडले किंवा आवडले नाहीत ते लिहून काढले. सर्वांचे पत्ते लिहून घेऊन संपर्क टिकवून ठेवण्याची हमी दिली. शिबिराचे अनुभव प्रत्येकाने आपल्या शब्दात लिहिले होते. सर्वांनी ते वाचून दाखवल्यानंतर शिबिराची सांगता झाली. पुन्हा पुढच्या वर्षी असे शिबिर घ्या, असे सांगून सर्वांनी शिबिराचा अनुभव उपयुक्त ठरल्याची पावती दिली.
      येतांना सर्व मुले आपापल्या पालकांना सोबत घेवून आली होती. जातांना मात्र बहुतेक सर्व स्वत:च एकट्याने परत गेलीत. 
***************

1 comment:

Gruhkhoj Kolhapur said...

very nice and informative details. get here... visit amravati properties free, without brokerage